पितृसत्तेविरोधातला आंतरराष्ट्रीय आवाज

चिलियन सामान्य माणसापासून तिथल्या न्यायव्यस्थेच्या मनामनात ठासून भरलेल्या लैंगिक भेदभावामुळे अनेकदा लैंगिक हिंसाचारातल्या पिडितांनाच त्रास सहन करावा लागतो. त्यामुळेच तिथली न्यायव्यवस्था, तिथलं प्रशासन, वकील, डॉक्टर्स हे सगळेच पितृसत्तेचे पाईक आहेत. हेच बलात्कारी आहेत असं म्हणत चिलीमधल्या बायकांनी गाणं सादर केलं. तुम्हीच आहात बलात्कारी असं म्हणत डोळ्यांवर पट्टा बांधून डान्स करत हे गाणं गायलं.
‘लासटेसिस’ या थेअटर कंपनीनं हे गाणं लिहिलंय. लायटेसीस हा इथला स्त्रीवादी ग्रुप म्हणून ओळखला जातो. अर्जेंटिना देशातली अभ्यासक रीटा सेगाटो हिच्या कामावरुन प्रभावित होऊन हे गाणं लिहिलं असल्याचं सांगितलं जातं. लैंगिक हिंसाचार हा नैतिकतेचा मुद्दा नाही. ती एक राजकीय समस्या आहे, असं रीटाचं म्हणणं आहे.
चिलीमधे सादरीकरण झाल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून हळूहळू सगळ्या देशात हे गाणं पसरलं. त्यानंतर चिलीप्रमाणेच मॅक्सिको, जर्मनी, फ्रान्स, युके, स्पेन अशा अनेक देशातल्या महिलांनी रस्त्यावर येऊन नाचत हे गाणं सादर केलं. काही देशांनी तर हे गाणं सादर करण्यावर बंदीही घातली. पण ती बंदी झुगारत आज हे गाणं जगभरात आंतरराष्ट्रीय बलात्कार विरोधी गीत म्हणून ओळखलं जातंय.
मुळातलं गाणं आहे स्पेन भाषेतलं. पण अनेक भाषांमधे या गाण्याचा अनुवाद होतोय. जगभरातल्या सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत हे गाणं पोचण्यासाठी त्याचे आणखी अनुवाद व्हायला हवेत. याच गाण्याचा मराठी अनुवाद लेखिका आणि भाषांतरकार मुग्धा कर्णिक यांनी केलाय. त्यांनी आपल्या फेसबूक अकाऊंटवर या बलात्कारविरोधी गीताचं मराठी स्वैर रुपांतर शेअर केलंय.
इथे करते न्याय आमचा बापसत्तेची नीती
जन्मा येताच ठरवून टाकतो पोरींची नियती
रोज रोज होते शिक्षा, दिसत नाहीत वळ, व्रण
मोकळे जगणे मुश्किल करते बापसत्तेची नीती
मारतात इथे बायांना, मारणाऱ्यांना कवच आहे
करतात गायब बायांना, त्यांनादेखील कवच आहे
बळजबरीचा भोग घेतात, त्यांना देखील कवच आहे
बाईचीच चूक, बाई कुठे होती,
बाईचीच चूक, बाई काय नेसली होती
बाईची चूक नसते काही हे बापसत्तेला मान्य नाही.
म्हणूनच सांगते आता बापसत्ताच बलात्कारी
तुम्हीच आहात बलात्कारी
तुम्हीच आहात बलात्कारी
तुम्हीच आहात बलात्कारी
बापसत्तेचे पाईक कोण-
पोलीसही आहेत त्यात
न्यायाधीशही असतात त्यात
वकील, डॉक्टर, पत्रकारही
सारे सरकार आहे त्यात
संस्कृतीवादी राष्ट्रप्रमुखही
संस्कारघोट्या संघटनाही
जुलमी सरकार बलात्कारी
जुलमी प्रशासन बलात्कारी
तुम्ही आहात बलात्कारी
तुम्ही सारे बलात्कारी
झोप बाळे झोप शांत
चोरडाकूची चिंता नको
-अंगांगावर लक्ष ठेवून
सारे प्रेमळ शौकीनबाप
हे गाणं चिलिलीयन प्रोटेस्ट सुरु होण्यापूर्वी फार आधी लिहिलं असलं तरी गाणं गाताना जो डान्स केला जातो त्यात चिलिलीयन निषेधाचं प्रतिबिंब दिसतं. गाणं गाताना त्यांनी डोळ्यांवर बांधलेली पट्टी ही पुरुषसत्तेची पट्टी आहे. एकदा ही पट्टी बांधली की बलात्कार करणारा आरोपी समोर असूनही दिसणार नाही अशी अवस्था होते. ही पट्टी काढून गाणं गाणाऱ्या महिलांचा, पितृसत्तेविरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाचा आवाज आता आपण ऐकायलाच हवा. कारण आता हा आवाज आंतरराष्ट्रीय गीत झालंय!
(regards,  Kolaj.in)

Comments